फेसबुक आभासी जग…अवास्तवातून वास्तवतेकडे….


फेसबुक आभासी जग…अवास्तवातून वास्तवतेकडे….

पक्ष्यांना स्वछंदी फिरण्यासाठी ,भिरभिरण्यासाठी आभाळ आहे….तर देवानेच म्हणाव (झुक्याभाऊने…)आपल्याला स्वछंदी भिरभिरण्यासाठीच हे आभासी जग बनवल आहे …इथे स्वतःची स्वतंत्र घर बनवून आपल्याला हव तस मनसोक्त ,हव ते जगता येत,स्वताःचे छंद जपता येतात अन् हवे तितके व्यक्तही होता येत….या आभासी जगात स्वताःच्या आयुष्याची दोरी स्वतःच्या हातात ठेऊन मनसोक्त विहार जगात करुच शकतो.मग ह्या पेक्षा स्वछंदी जगणं काय असू शकत….???

पण…..रोजच्या आयुष्यातली गर्दी विसरुन ह्या आभासी जगात जरा विसावा घ्यावा तर, इथेही अनोळखी ओळखीचे होतात….ओळख ,मैञी,मग….मैञीच नात सोडून भावनीक जवळीक अन् मग त्या नात्याला प्रेमाच नाव देऊन बसतात.जी गर्दी सोडून इकडे आलो तीच  इकडेही गर्दी स्वतःभोवती करुन स्वतःच अस्तित्व हरवून पुन्हा एकदा एकटेपणाच्या गर्द छायेत स्वतःला घेऊन जातात.

खरतर आयुष्यभर सोबत राहूनही माणसांचा स्वभाव कळत नाही,माणस ओळखता येत नाही अन् इथे एखाद्याला न पहाता, न भेटता,नुसते बोलून कसे काय ओळखू शकतो..??शब्दांचे खेळ तर सगळेच खेळतात..शब्दाचा अर्थ घेऊ तसा निघतो….पण कुणी छान लिहीत असेल तर त्या व्यक्तीचे शब्द भावतात,आपलेसे करतात ,अगदी मनात घरही करतात.पण मग ते  त्या व्यक्तीने लिहीलेल आपल्यासाठीच लिहील आहे किंवा कुणासाठी लिहील हा प्रश्न मुळातच नसतोच…कारण लिहीणारा हा आपल्या कल्पनेप्रमाणे सुचेल तसे लिहित असतो.आपण वाचक म्हणून त्या शब्दांचा,लिहीण्याचा आदर,कौतूक करु शकतो..त्या व्यक्तीच्या अगदी शब्दांशी मैञीही करु शकतो….पण ही मैञी करता करता…त्या मैञीला प्रेमाच नाव देऊन ती मैञी गढूळ का बर करावे??अन् मग ते नात निभावता नाही आल कि एकमेंकाना दोष देत बसतात.हे कितपत योग्य आहे??

आभासी जगात प्रत्येकाच्या मानसिक,भावनिक,शाब्दिक गरजा पुर्ण होऊही शकतात..पण शेवटी त्याला इकडे मर्यादा आहे.कारण इथल्या प्रत्येकाला प्रत्येकाच खाजगी आयुष्य आहे.जबाबदार्या आहेत..अन् त्या सोडणं कधीच शक्य नाही.कारण कधीही वास्तवात जगणं हिताच ठरतं.बहुतकरुन बरेच लोक विवाहीत आहेत तरिही ऐकमेकांच्या प्रेमात पडून ऐकमेकांना भावनिक गुंतवून,शब्दांचे खेळ करुन भावनिकता वाढवून स्वतःलाच विसरुन जाणं सर्रास या आभासी जागात चाललेल दिसत आहे.

एखाद्याबद्दल प्रेम वाटण,असणं,ते प्रेम व्यक्त करण खुप सोप आहे.पण हे आभासी जग आहे…नुसता आभासच सभोवताली असतो…इथल्या मर्यादा वाढवू शकत नाही…अन् त्यामुळे ते प्रेम निभावण्यासही बंधने निर्माण होतात.

कारण…आपल खरं आयुष्य अन् आभासी आयुष्य यांचा ताळमेळ घालण कठीण होत जात…अन् ऐकाचवेळी “दोन प्रेमाची नाती”संभाळणही कठीण असत…त्यातल्या त्यात जर कुणी ती नाती संभाळण्यात यशस्वी झालाच तर दोन्हीपैकी एका नात्यावर अन्यायच होतो.निर्माण झालेल नात निभावता नाही आल तर ती फसवणूक नाही होऊ शकत..कारण इथे व्यक्ती बदलण्याची, सोडून जाण्याची ,न बोलण्याची कारणंही आहेत……आणि अर्थात ती कारणे अगदी खरीपण आहेत.कारण दोघांनीही एकमेंकात बुडून जाऊन ,भावनांच्या आहारी जाऊन इतके ऐकमेंकात गुंतले तर ऐकमेंकाशिवाय जगणं कठीण होईल..याच भान एकाला तरी ठेवायला हवच ना…??नाहीतर प्रवाहासोबत वहावत गेल तर शेवटी बुडणंच होत..ही एक बाजू झाली…

दुसरी बाजू जरी 100% गुंतून नात निभावण्याचा प्रयन्त केला तरी आपल्या व्ययक्तिक कुंटुंबाच काय???पुरुष असो वा स्ञी घर,मुल,बायको,नवरा,आईवडील ,त्याच्या जबाबदार्या आहेतच की…त्या सोडून सतत या आभासी जागात पडीक राहून ऐकमेंकाना पुर्ण वेळ देणं अशक्य आहे…इथे commitment पाळणं म्हणजे तारेवरची कसरतच.आणि कुणाला आपल्या बद्दल कळाल तर नावाची भितीही मनात रहातेच.कारण इथे प्रत्येकालाच सुरक्षित रहायच असतं…छान व्यक्तीमहत्त्व म्हणून तग धरायचा असतो.

मग …..कुणाच्यातरी विरहात जळत बसण्यापेक्षा आपल्या भविष्याचा,वर्तमानाचा विचार करावा ना…आयुष्य एकदाच तर मिळत..ते काय रडत रडत जगण्यासाठी का??इकडे नाही पटल ,आवडल तर एक ब्लॉक  बटणवर क्लिक केल की ती व्यक्ती दिसेनाशी होती…मग आपणच का आपल्या मनावर शरिरावर ,विचारावर परिणाम करुन शब्दांना…..विरहात उतराव??

खरतर एक लक्षात घ्यायला हवं…ह्या आभासी जगात लाखो करोडो लोक आहेत…तरीही आपण इतके ओळखीचे कसे काय झालो…..काहीतरी आपले ऋणानूबंध आहेत हा असा विचार करुन इकडे भेटलेला सगळा मिञ परीवार जपायला हवा.उगिच कुणाच्या कवितेच्या ,शब्दांच्या सौंदर्याच्या,बोलण्याच्या प्रेमात पडून आपल छान स्वछंदी आयुष्य का दुषित करायचे??

प्रेम हे असच सहज मिळणारी गोष्ट नाहीये अन् आभासात राहून प्रेम आहे म्हणण्यातही अर्थ नाही.म्हणूनच मैञीच नात जोडा ,मनापासून जपा पण थोडस अंतंर ठेऊनच…स्वतःचा आरसाटा कुणाला न घेऊन देता..आणि कुणाचा आरसाठा  न घेता.कारण इकडे सगळेच “आपले” वाटणारे खरे नसतात…स्वतःपेक्षा कुणावरच विश्वास  ठेऊ नका.

आपल्या आयुष्यातील आपल्याशी समोरासमोर प्रत्यक्ष बोलणारीच माणसे आपला “वर्तमान” आहे हे मनाला ठाम समजवायला पाहीजे.अन् मनाने ते मान्यही करायला पाहीजे.तरच ह्या आभासी जगात आपण खंबिरपणे उभा राहू शकतो.नाहीतर उगिच कुणाचा आधार शोधून त्या व्यक्तीवर अवलंबून राहून स्वतःचा कुमकुतपणा कश्याला तो दाखवायचा….??

“जियो जिंदगी अपनी मर्जी से”…..हे ब्रिद आपल्या आयुष्याच असायलाच हवयं.. आपल्याला हवे तसे…आपल्या पद्धतीने….आपले छंद जोपासत…आपल्या अंतरीच्या शब्दांना,कल्पनांना स्वतःसाठी मार्ग काढून व्यक्त व्हाव…हा इथे आभासी जगात भरपूर छान व्यक्ती आहेत अन् भेटतातही ,तर त्यांची मैञी जपा..त्यांना आपल सर्वस्व नका बनवू… कारण त्या व्यक्तीलाही खुप अवघड जात आणि आपल्यालाही हे लक्षात घेऊन……वाटचाल करा.

झुक्याभाऊने निर्माण केलेल्या विश्वात स्वछंदी फुलपाखरासारखे उडा…..अन् जगण्याचा सुंदर आयुष्याचा आंनद घ्या.
स्पंदन@सोनाली कुलकर्णी
7 march 2017
आज २१ मार्च – जागतिक काव्य दिनानिमित्त थोडेसे ….


आज २१ मार्च – जागतिक काव्य दिन साजरा करतात .त्यानिमित्याने थोडेसे माझ्या सर्व मित्र -मैत्रिणी कवी मनासाठी …

कविता करणं हे शिकता किंवा शिकवता येत नाही. गाताना सुराचं ज्ञान जसं उपजत असावं लागतं, नृत्यात एखाद्याच्या शरीरातच ताल असतो, तसंच कविता सुचताना आपल्या मनाला काय हवंय, कशासाठी हवंय हा विचार लिहिताना एक दृष्टी असावी लागते. एक तर हे सगळं तुमच्यात असतं किंवा नसतं. नुसतंच असं मिळवता येत नाही. नजरेतून आपल्याला दिसलेली सौंदर्यदृष्टी मांडता यायला हवी ती आखून देऊ नाही शकत.
कविता म्हणजे सृजनशील आत्म्याचा उच्चार, भावनांचा उत्कट आणि उत्स्फूर्त आविष्कार, नि:शब्दाला शब्दात आणण्याचे साधन, भावनेत भिजलेला शब्द आणि त्यापलिकडेही काहीतरी आहे जे एक संवेदनाक्षम मन सहज जाणू शकतं. आणि त्या मनाला व्याख्या समजावून घेण्याची आवश्यकता नाही!

कविता लिहिताना तुमच्या मनात जे भाव असतात, ते भाव कवितेत उतरतात प्रेमकविता लिहिणं आणि इतर कविता लिहिणं, यांत तसा काही फरक नसतो. कविता कधीच आपल्या स्वाधीन नसते.  बर्याचदा वेळा सहज ,अगदी पटकन सुचून जाते तर कधी कधी मनातल्या भावना पूर्णपणे व्यक्त होई पर्यंत कविता पुर्णत्वाला जात नाही. कविता सुचायला वेळकाळ लागत नाही तरीही ,कवी ग्रेस याच्या खूप सुंदर ओळी आठवल्या .त्याच्या एका कवितेत ते म्हणतात संध्याकाळचा प्रहर हीच एक स्वतंत्र कविता असते. ..

‘या व्याकुळ संध्यासमयी,शब्दांचा जीव वितळतो
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे, मी आपुले हात उजळतो’

शब्दांसाठी जीव वितळावा  लागतो तेव्हाच कुठे कविता बनते .किती खर आहे ना ..
खरच कविता म्हणजे सोपे शब्द, अंगभूत लय-नाद आणि मोजक्याच शब्दांत परिपूर्णपणे उतरलेला मनातला भाव. एखादी कविता उठून दिसण्यासाठी कठीण शब्द त्यात पेरले पाहिजे असं मुळीच नाही. कारण कवी हा शब्दांचा दास नसतो, तर तो अर्थांचा प्रभू असतो.कवीमन जसा श्‍वास घेतात तश्याच कविता करतात.
अश्या माझ्या सर्व कविमन असलेल्या ,कविता लिहिणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींना जागतिक काव्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!
कवियत्री इंदिरा संत यांची “लिहिताना “ नावाची खूप सुंदर कविता आहे …आज जागतिक काव्य दिनानिमित्त सर्वांसाठी….
“लिहिताना – इंदिरा संत”
अडखळे लिहिताना
हात कधी अवचित
आणि निरखून डोळे
पहातात अक्षरात
कानावेलांटीचा डौल,
मोड तशी अक्षराची
कधी द्यावी, कधी नाही
रेघ अक्षरावरची
नकळत उमटली
कुणाची ही काय तऱ्हा
इवल्याशा रेषेमाजी
भावजीवनाचा झरा
नव्हेतच अक्षरे ही;
स्मृतीसुमनांचे झेले
एकाएका अक्षरात
भावगंध दरवळे
म्हणूनीच लिहिताना
अवचित थांबे हात;
धुके तसे आसवांचे
उभे राही लोचनांत
स्पंदन @ सोनाली कुलकर्णी .
किस्सा आयुषचा...
किस्सा आयुषचा....

दिवाळी पार पडली ....अजून 10 दिवस सुट्टी शिल्लक राहिली ...
बिल्डिंग मधील सगळी मुलं सुट्यांना गेली. मग काय माझ्या आयुष साहेबांना bore होणं सुरू झालं....
आयुष सारखं इकडून तिकडून यायचं आणि
 "आता मी काय करू ?" विचारायचं
मला खूप बोअर होतयं ,मला बोअर होतयं...
तसा माझा सगळा वेळ त्यालाच अर्पण असतो तरी देखील
ती मुलांसोबत क्रिकेट खेळायची  सवय लागली तेव्हापासून हे बोअर होतयं प्रकरण सुरू झालं....
मग म्हणलं आता तुला ह्या आजीकडे नाहीतर त्या आजी कडे सोडते तुला सुट्टीला....
हा मग .....सासरी ठाण्याला सुट्टीला जायचं ठरलं...
आजी अब्बाचा लाडका आणि म्हणलं ते अब्बा आणून देतात ...आणि विशेष म्हणजे घराच्या जवळच दोन गार्डन आणि शिवाय खेळायला दादा देखील(दिरांचा मुलगा)
मग सोडून आले 8 दिवसांसाठी...

तर किस्सा असा की....
दुसरे दिवशी मला फोन आला
Mammy काय करते ग....
म्हणलं काही नाही  घरातली काम आवरते आहे ....
पुन्हा  तोच प्रश्न mammy काय करतेस...
अरे ...काही नाही करत.... तू बोल ना आयुष
बाबा कुठेय.....??
मी नाही तर सुट्टी घेतलीय काय त्याने??कुठे फिरायला गेला आहे का तुम्ही??
( मी इकडे डोक्यावर हात मारून घेतला ....पोरगं काय बोलेल काही सांगता येत नाही😂)
म्हणलं नाही रे, बाबा ऑफिस ला गेलेत
.पुन्हा  तोच प्रश्न mammy काय करतेस...
मग म्हणलं बोल रे पिल्लू काय म्हणतोयस....
मग हळूच म्हणतो....
तुला माझी अजिबात आठवण येत नाही ना??
खरं खर सांग हं....
मी तुला खूप त्रास देतो ना  ..... मग कशी येईल तुला आठवण माझी...??
तू हवं ते एकटीच tv वर  तुझे प्रोग्रॅम पाहत असशील ना....आणि रिमोट पण कुणी लपवून नाही ठेवणार ना...

(बहुतेक स्वतःचे सगळे कारनामे लक्षात आले असतील)
(मला तर खूप हसायला  येत होतं की हा एव्हढा एव्हढासा पण किती विचार करतोय)

मी:  अरे नाही रे बाळा.....येतंय ना खूप खूपआठवण येतीय तुझी....
आठवण येणार नाही असे कसे होईल रे बाळा ,
तू माझं पिल्लू ना...
माझा गोडूला ना ....माझा दादू ना तू ....मी फक्त तुझीच आहे ना....😘
आणि हो ना...….
आता tv चा remote माझा झालाय 😘 तू आलास की तो पुन्हा तुझाच हं...

मी पिल्लू ,गोडूला,दादू ,आणि मी तुझीच आहे म्हणल्यावर सगळ्या त्याच्या बहुतेक शंका दूर झाल्या असाव्यात आणि लगेच फोन ठेवू का म्हणाला आणि फोन ठेवता ठेवता
मम्मी miss you म्हणाला (हाच तो त्याच्या गोड आवाजातला माझ्यासाठी  सुखाचा क्षण )
त्याच बालपण एन्जॉय करत असताना त्याची निरागसता दिवसेंदिवस मनाला जास्तच भावते....आणि त्याचा माझ्याबद्दलचा पझेसिव्हपणा माझ्या मनावर लख्ख  कोरून जातो.
@सोनाली कुलकर्णी
#किस्साआयुषचा #लहानपणादेगदेवा