जुनाच तो पाऊस....
जुनाच तो पाऊस.....

पाऊस आणि आठवणीच किती जवळचं समीकरण.....
दरवर्षी पाऊस नव्याने पडतो....पण तो दरवेळेला भूतकाळात घेऊन जातो.....मग कधी लहापणाचा पाऊस आठवतो ,मित्र मैत्रिणीसोबत ,भाऊ बहिणीसोबत पावसात खेळलेले क्षण, आईबाबांचा पावसात भिजू नको म्हणून खाल्लेला ओरडा असो वा  अंगणात पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या करून सोडलेल्या आठवणी असो.तर कधी दप्तर भिजत शाळेत गेलेला पाऊस आठवतो....तर कधी कॉलेज मधला पावसामुळे कॉलेजमध्येच अडकलेलो असताना मित्र मैत्रिणीसोबत कॅन्टीन मध्ये वडापाव ,भजी,चहा चा आस्वाद घेत घालवलेला वेळ आठवतो.तर कधी प्रेमात पडल्यावर ,प्रियकरासोबत /प्रियसीसोबत चिंब भिजलेले क्षण,नकळत झालेले स्पर्श आठवून मनात गुदगुल्या होतात,तर कुणाला लग्नानंतर जोडीदारासोबत सैर केलेला,भिजलेला पहिला पाऊस आठवतो...तर ऑफिस मध्ये काम करत खिडकीतुन बाहेर पडणारा पाऊस आणि त्यासोबतच्या आठवणी आठवतात.कधी पावसात झालेली फजिती आठवते तर कधी अतिवृष्टी मुळे झालेले नुकसान ,दुःख आठवते.कधी हव्या वाटणाऱ्या ,कधी नको वाटणाऱ्या आठवणी ह्या पावसासोबत दरवर्षी येतच असतात.पावसाच्या आठवणींना कुठे बंधन असत म्हणा....पावसाच्या आठवणींची ही शृंखला दरवर्षी वाढणारच आहे.

जशी कातरवेळ आठवणींना घेऊन येते अन भावनिक बनवते तसाच हा पाऊसही आपल्याला भावनिक करून जातो, जुन्या आठवणींना उजाळा देतो ,रोमँटिक बनवतो ,प्रेमात पाडतो,  तर कधी आयुष्य जगायलाही शिकवतो....तर कधी कधी आयुष्यभराचा धडाही शिकवून जातो तर कधी स्वतःला सावरायला शिकवतो

प्रत्येकाला पाऊस हा हवा हवासा वाटतो...तर कधी अति झाला तरी नकोसाही वाटतो, तरीदेखील आपण ह्या पावसाची दर वर्षी आतुरतेने वाट ही पाहतोच....कारण सगळयांचाच पाऊस एकच असला तरी प्रत्येकाच्या आठवणी अगदी वेगवेगळ्या...त्यातल्या काही आठवणी ह्या हव्या हव्याच्या वाटणाऱ्या असतातच.

आणि खरं सांगायचं तर.....ग्रीष्मातल्या कडक उष्णतेला  शमवून आपल्याला गारवा देण्याची, ताकद तर फक्त त्या पावसातच आहे.... म्ह्णूनच तो जुना वाटणारा पाऊस नव्याने बरसला की ....
पाऊस मनाला एक आत्मीय समाधान देतो,आठवणींच्या हिंदोळ्यावर प्रेमाचे ,आपुलकीचे प्रतिबिंब उमटवून जातो.
आणि असलीच पावसाला कधी दुःखाची लकेर तरी तो अडचणीत आयुष्य जगायला शिकवतो.

पावसावरच एक खूप जास्त आवडलेलं वाक्य म्हणजे
Without rain, nothing grows. Learn to embrace the storms of your life.🌦️☔
@सोनाली कुलकर्णी

#बेंगलोरचा_पाऊस☔ #spandankavitaa
कोरोना बालगीत
आयुषचे बोलणं.....वेगळ्या रुपात.
बालकविता कोरोना दादासाठी😂😂

अहो कोरोना दादा...
अहो कोरोना दादा 
तुम्ही ठरवलं तरी काय...??
सगळ्यांना घरी बसवून 
तुम्हाला मिळतं तरी काय??

इकडे जाऊ नको,
तिकडे जाऊ नको
इथे हाथ नको लावू
तिथे नको हाथ लावू...
सगळीच बंधन फक्त आम्हालाच का??
तुम्ही मात्र आपले मोकाट फिरताय
आम्हाला तेव्हढी lockdown ची शिक्षा का बरं देताय??

इतका सगळा त्रास देऊन आम्हाला 
तुम्हाला मिळतं तरी काय??
त्रास नको देऊस असा ,कोरोनादादा,
देव वरून तुझ्याकडे बघतोय बघ कसा,

कोरोनादादा माहीत नसेल तुला तर ,
एक गोष्ट सांगतो,
अगदी प्रेमाने सांगतो,
निघून जा लवकर नाहीतर
तुझ्या पापाचा घडा भरेल...
पापाची शिक्षा सगळी तुला
ह्याच जन्मात भोगावी लागेल...😂

(Lockdown ला वैतागलेला...
मम्मीला भेटू न शकण्याचं दुःख मनात असल्यामुळे ,
त्याला कोरोना बद्दल खूप प्रश्न पडतात
कोरोनालाच दम देतो....निघून जा रे कोरोना...

मी नेहमीच सांगते त्याला देव वरून सगळं बघत असतो.....कधीच कुणाला त्रास देऊ नये.आणि 
कधीतरी मी म्हणलेलं ऐकलं होतं आयुषने ,
'ह्या जन्मातील पाप ह्या जन्मतःच भोगावी लागतात ....'
ते बरोबर त्याने कोरोनाला apply केलं....
"पाप" ह्या शब्दाचा अर्थ  माहीतही नाही तरीही हा शब्द कोरोनाला बहाल केला त्याने आज😉
वर मला म्हणतो
किती कोरोना पाप करतोय ग मम्मी?
त्याला आता त्रास देताना छान वाटतय पण नंतर त्याच कसं व्हायच ?

खरंतर फार हसायला आलं होतं त्याची वाक्य ऐकून ...मग म्हणल एक कोरोनावर बाल कविताच लिहावी
त्याचच बोलणं जरा वेगळ्या रुपात लिहायचा प्रयन्त)
©सोनाली कुलकर्णी
कोरोनासोबतजगताना
#कोरोनासोबतजगताना....

आयुष्य खूपच अनिश्चित आहे....
कोणता दिवस कसा येईल हे आपण सांगूच शकत नाही..
कोरोनाचे संकट भयानक आहेच.....पण....
त्यामुळे जे आपण lockdown च आयुष्य जगतोय 
तेही अगदी थोडे दिवस बरे वाटले पण ....
आता असह्य होतंय अगदी सगळयांनाच. तरीही .....

ह्या काही दिवसात आपल्या हातातून कोणत्या गोष्टी  निसटल्या ,कोणत्या गोष्टीमुळे आपण खचलोय,
ह्या वर्षात काय काय मिळवलं,काय काय गमावलं..?
किती वर्षे आपण मागे गेलो,
किती आपलं नुकसान झालं ??
याचा लेखाजोखा....करायचाच नाही....
कारण आपल्या हेल्थपेक्षा कोणतीच संपत्ती आता महत्वाची नाहीये.

हे संकट एकट्या दुकट्या एका कुणावर आलेलेच नाहीये सगळं जग भोगतोय....
प्रत्येकाने इथे काहींना काही सहन केलंच आहे.
फक्त आता एकच प्रार्थना करायची....
आपल्यासाठी "देवरूपात झटणाऱ्या" सगळ्या लोकांच्या मागचा हा त्रास लवकर संपावा.
आणि आपणच आपली काळजी घेवून....
2020 मध्ये फक्त एकच गोष्ट करायची....
"येणाऱ्या 31 डिसेंबरला आपण आणि आपली फॅमिली मेंबर्स जिवंत आहोत की नाही इतकंच पहायचं ...."
बाकी .....
आयुष्य वेगवेगळ्या वळणावर आपली परीक्षा घेतच असतं.. हीदेखील आपली परीक्षा आहे हे समजून...
खंबीर राहून....लढा दिला तर....नक्कीच यातून तरून निघू..जगलो तर पुढचं आयुष्य आनंदात घालवू.गमावलेले सगळं पुन्हा मिळवू.

18 may नंतर जरी Laockdown वाढला तरी संयमाने आपल्याला घ्यायलाच  हवं....
आणि शिथिल झाला तर आपली जबाबदारी अजून वाढते....
आपण सगळेच एका नौकेचे प्रवासी आहोत.
फक्त स्वतः एकट्या पुरता विचार न करता...
स्वतःसोबत इतरांचीही काळजी घेणं.
सुरक्षित अंतर ठेवून, लांब राहून काळजी घेणं हेच 
आपलं पहिलं ब्रीद वाक्य असेल.

सगळे नियम पाळून,
आपणच आपलं आयुष्य सुखकर करूयात....
ह्या कोरोनालाच त्याच्यासोबत दोस्ती करून हरवूया

@सोनाली कुलकर्णी