आपल्या आयुष्यात काही माणसं अशी असतात, ज्यांच्याशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. आई-वडील, भावंडं, नवरा,सासरची मंडळी अगदी जवळचे मित्र-मैत्रिणी ही नाती आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असतात. त्यांच्यावर आपलं खूप प्रेम असतं आणि तसेच त्यांचेही आपल्यावर प्रेम असतं. पण कधी कधी, याच प्रेमाच्या नात्यात नकळतपणे एक चूक आपल्याकडून नियमित घडत असते ती म्हणजे आपण त्यांना गृहीत धरतो.
समोरच्या व्यक्तीने आपल्याला गृहीत धरले की आपल्याला त्याचा त्रास वाटतो,चिडचिड होते कधीकधी खूप रागही येतो...
पण..आपणही कुणाला तरी गृहीत धरत असतोच की...
खरतर "सगळे नियम हे फक्त इतरांसाठी नसतात, आपल्यासाठीही असतात" हे आपण विसरूनच जातो.
आपल्यालाही वाटतं की ही व्यक्ती आपलीच आहे, ती कुठे जाणार आहे? ती आपल्याला समजून घेईलच की, झालीच आपल्याकडून चुक तर माफ करेलच की आणि याच विचारात आपण कधी कधी त्यांच्या भावनांचा, त्यांच्या अपेक्षांचा किंवा त्यांना काय हवंय याचा विचार करणं सोडून देतो.
गृहीत धरण्याचे अनेक प्रकार असू शकतात.
कधी आपण त्यांच्या वेळेची कदर करत नाही, कधी समोरच्या व्यक्तीने मदत करेलच असे सहज गृहीत धरतो,
कधी पटकन काहीतरी बोलून त्यांच्या भावना दुखावतो,हल्ली तर whatsapp वर msg करून सुद्धा मनातला राग व्यक्त करतो ,समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावतो आणि एवढ सगळ करून 'ती व्यक्ती आपलीच आहे, समजून घेईल' या विचाराने दुर्लक्षही करतो.
याचा परिणाम काय होतो? ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो, तिलाच आपल्या या वागण्याने त्रास होतो. हळूहळू, मनात नाराजी निर्माण होते , गरज नसताना दुरावा निर्माण होऊ लागतो आणि कधी कधी तर एकमेकांशी बोलू सुद्धा नये इतकी कटुता निर्माण होऊ शकते.
आपल्याला हे भान ठेवायलाच हवं की, कोणतंही नातं हे गृहीत धरण्यासाठी नसतं. प्रेम आणि आदरानेच ते टिकून राहतं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, तिला आदर देणं, तिच्या भावनांचा विचार करणं आणि त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याकडून काय हवे ते समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे.
तिच्या असण्याला महत्त्व देणं, तिने केलेल्या गोष्टींची कदर करणं आणि वेळोवेळी आपलं प्रेम व्यक्त करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
नात्यांमधील ही गृहीत धरण्याची सवय आपल्याला आणि आपल्या प्रिय व्यक्तीला दोघांनाही त्रास देऊ शकते.
म्हणून कोणतीही गोष्ट करताना, क्षणभर विचार करायला हवा. आपल्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीला आपण गृहीत धरत तर नाही ना?
कारण, काही नाती खरोखरच अनमोल असतात आणि ती जपायलाच हवीत.
@सोनाली कुलकर्णी
#सहज_सुचलं_म्हणून
#realationshipgoals #नातं #follower #followersシ゚
0 comments: