कविता करणं हे शिकता किंवा शिकवता येत नाही. गाताना सुराचं ज्ञान जसं उपजत असावं लागतं, नृत्यात एखाद्याच्या शरीरातच ताल असतो, तसंच कविता सुचताना आपल्या मनाला काय हवंय, कशासाठी हवंय हा विचार लिहिताना एक दृष्टी असावी लागते. एक तर हे सगळं तुमच्यात असतं किंवा नसतं. नुसतंच असं मिळवता येत नाही. नजरेतून आपल्याला दिसलेली सौंदर्यदृष्टी मांडता यायला हवी ती आखून देऊ नाही शकत.
कविता म्हणजे सृजनशील आत्म्याचा उच्चार, भावनांचा उत्कट आणि उत्स्फूर्त आविष्कार, नि:शब्दाला शब्दात आणण्याचे साधन, भावनेत भिजलेला शब्द आणि त्यापलिकडेही काहीतरी आहे जे एक संवेदनाक्षम मन सहज जाणू शकतं. आणि त्या मनाला व्याख्या समजावून घेण्याची आवश्यकता नाही!
कविता लिहिताना तुमच्या मनात जे भाव असतात, ते भाव कवितेत उतरतात प्रेमकविता लिहिणं आणि इतर कविता लिहिणं, यांत तसा काही फरक नसतो. कविता कधीच आपल्या स्वाधीन नसते. बर्याचदा वेळा सहज ,अगदी पटकन सुचून जाते तर कधी कधी मनातल्या भावना पूर्णपणे व्यक्त होई पर्यंत कविता पुर्णत्वाला जात नाही. कविता सुचायला वेळकाळ लागत नाही तरीही ,कवी ग्रेस याच्या खूप सुंदर ओळी आठवल्या .त्याच्या एका कवितेत ते म्हणतात संध्याकाळचा प्रहर हीच एक स्वतंत्र कविता असते. ..
‘या व्याकुळ संध्यासमयी,शब्दांचा जीव वितळतो
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे, मी आपुले हात उजळतो’
शब्दांसाठी जीव वितळावा लागतो तेव्हाच कुठे कविता बनते .किती खर आहे ना ..
खरच कविता म्हणजे सोपे शब्द, अंगभूत लय-नाद आणि मोजक्याच शब्दांत परिपूर्णपणे उतरलेला मनातला भाव. एखादी कविता उठून दिसण्यासाठी कठीण शब्द त्यात पेरले पाहिजे असं मुळीच नाही. कारण कवी हा शब्दांचा दास नसतो, तर तो अर्थांचा प्रभू असतो.कवीमन जसा श्वास घेतात तश्याच कविता करतात.
अश्या माझ्या सर्व कविमन असलेल्या ,कविता लिहिणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींना जागतिक काव्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!
कवियत्री इंदिरा संत यांची “लिहिताना “ नावाची खूप सुंदर कविता आहे …आज जागतिक काव्य दिनानिमित्त सर्वांसाठी….
“लिहिताना – इंदिरा संत”
अडखळे लिहिताना
हात कधी अवचित
आणि निरखून डोळे
पहातात अक्षरात
कानावेलांटीचा डौल,
मोड तशी अक्षराची
कधी द्यावी, कधी नाही
रेघ अक्षरावरची
नकळत उमटली
कुणाची ही काय तऱ्हा
इवल्याशा रेषेमाजी
भावजीवनाचा झरा
नव्हेतच अक्षरे ही;
स्मृतीसुमनांचे झेले
एकाएका अक्षरात
भावगंध दरवळे
म्हणूनीच लिहिताना
अवचित थांबे हात;
धुके तसे आसवांचे
उभे राही लोचनांत
स्पंदन @ सोनाली कुलकर्णी .
0 comments: