फोन वाजताच मी उचलताच…..पलीकडून आवाज

“अग मी सुपु बोलतीय .”

मी इकडे विचारात पडलेली….”आता ही कोण सुपु??”

“नाही ओळखले…जरा ओळखेल असे नाव सांगाल का..??”.मी कोण असेल याच विचारात बोलणार्या व्यक्तीला विचारले.

पलीकडून….डायरेक्ट शिव्याचा भडीमार..सुरु झाला…

“अजून मी जिंवत असताना मला विसरलीस??”

आता माञ तुझी कमाल झाली हं…..सोने…

जाऊ दे मी ठेवते फोन…..कळालं तुला तर कर याच नंबरवर परत फोन.

आणि मला क्षणात समजलंच असा अगावपणाने बोलणारी सुप्रियाच असू शकते..हे मनात क्लिक झाल आणि मी म्हणाले…”सुप्रिया…अगं किती दिवसांनी…??”

ती माञ…खुश झाली..कारण तसा जास्त वेळ न घेता मी  तिचा आवाज ओळखला होता

जवळपास बर्याच वर्षांनी सुप्रियाचा फोन आला.तश्या आम्ही शाळेपासूनच्या मैञीणी.पण शाळेनंतर वेगवेगळ्या ठिकाणी दोघीही शिफ्ट झाल्याने तसा अगदी आवर्जून भेटायचं ठरवले तरच संपर्क नाहीतर नाहीच.कांलातराने दोघीही आपआपल्या लाईफ मध्ये बिझी झाल्याने आवर्जून भेटणंही कमी झाल.बोलणंही कमी होत गेलं.

सुप्रिया फारच बडबडी…सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर बडबड करायची तीची ही सवय आजही तशीच टिकून आहे हे तिश्याशी बोलताना आज फोनवरही जाणवलं.दिसायला खुपच सुंदर, हुशार  तरीही कसलाही गर्व नसणारी..एक सालस मुलगी.

अगदी सगळे इकडचे तिकडचे बोलून झालं…पुर्वीच्या ,लहानपणाच्याही काही आठवणींही आठवून झाल्या..बरंच हसलोही.खुप मनाला बरं वाटलं…ती अगदी बोलताना “happiest women in the world” वाटत होती.

“पण प्रत्येक व्यक्ती जितकी आपण आंनदी आहे आपल्याला काहीच दुःख नाही असे दाखवते…ती खरंच सुखी असते का????” हा मला नेहमी पडणारा प्रश्न आजही  तिच्याशी बोलताना पडला होता.

तरीही मनात म्हणाले….असा हा सारखा प्रश्न पडणं बरोबर नाही…आणि बाकी काही तिला न बोलता…तिला म्हणंटले….अग लग्न कधी केलस ?बोलवसंही नाहीस ,मी बोलावल होत तर माझ्या लग्नाही आली नाही???

ती …काहीच बोलली नाही…

आमच्या संभाषणामध्ये खुपच शांतता पसरलेली

खरचं …..”मौनातली शांतता बरच काही बोलून जाते ना….”

आणि माझ्या मनात पडलेल्या प्रश्रांने पुन्हा डोक वरं काढले. खरचं…काहीतरी तिच्या आयुष्यात शिजतयं..ती दाखवते तसं काही बरं चाललेल नसाव.

मी…सुप्रिया आहेस ना ग…??

 “बोल ना काहीतरी ..इतकी शांत का झालीस??”

तीः “बोलण्या सांगण्यासारख असेल तर बोलेन ना ग…”

तिच हे वाक्य मनाला खुप चुटपुट लाऊन गेल…

म्हणजे??

अग,काही कळेल असे बोललीस तर कळेल ना मला.

मी शांतपणे तिला म्हणाले..

ती…हम्म…म्हणत पुन्हा …शांत झाली..आणि क्षणभराने बोलू लागली…मी फक्त ऐकत होते..

“सध्या घटस्फोट प्रोसेस मध्ये आहे….केस सुरुय.”

 I m totally shocked ..

ती पुढे  माझ्याकडे मन मोकळं करत गेली..

आमच लग्न होऊन 5 वर्ष झाले .दिनेश अगदी लग्न होण्यापुर्वी पासूनच सिंगापूर मध्ये एका MNC मध्ये काम करतो.आणि मी पुण्यात infosys मध्ये काम करते.

दोघांच जॉब लोकेशन वेगवेगळे….मी जॉब सोडुन तिकडे जायला तयार होते अगदी पुर्वीपासूनच पण त्याचा जॉब सोडण्यासही विरोध आणि मी तिकडे जाण्यासही.

लग्न झाल्या झाल्या मस्त पुण्यात 3BHk फ्लॕट घेतला..काही सातारा जवळ रोड टच जागाही घेतल्या त्यात माझेही आजपर्यंत मिळालेले पैसेही घातले.त्याच्यासाठी तो म्हणेल तसे सगळ केलं.अधून मधून सुट्टी घेऊन तोही इकडे यायचा, मी ही तिकडे जायची.आणि असंही नाही कि, आमच लग्न खुप गडबडीत झालयं….जवळपास एक वर्ष एकमेंकाना वेळ देऊन ,भेटून, बोलूनच झाल.हा तशी त्याची फॕमिली आपल्याच भागातली असल्याने आमची लग्नाला कुणाचीच हरकत नव्हती.सोशल मेडीयावरच जास्त जवळ आलो.आमचं ऐकमेंकाच टुनिंगही खुप छान होत.प्रेमात पडलो आणि मग लग्नही केलं.

लास्ट ईयर पर्यंत सार काही ठिक चालू होत….पण अलिकडे तो मला टाळू  लागला…फोन करणं,माझ्याशी बोलणं,अगदी msg ला उत्तर देणंही हळूहळू बंद केल.

इथे पुण्यामध्येही मी एकटीच रहाते…त्याचे आई बाबा गावाकडे असतात.तेही कोणताच रिसंपॉन्ड करत नाहीत.

माझं काही चुकलयं का हे जाणून घ्याव तर तेही कळेना…खुप अस्वस्थ होते.दिवस येईल तसा घालवत होते.वाटतं होत जाव पटकन त्याच्याकडे आणि विचारावं त्याला का असे वागतोय..काय गुन्हा झालाय माझा.??

आणि ठरवलं..जायच सिंगापूरला..

त्याला काही न कळवता गेले तिकडे…

तो रहात असलेल्या..म्हणचे मीच तिकडे जाऊन सजवलेल्या घरी…

जे काही पहायला मिळाल ते सार अजबच…हादरुन गेले…त्याची मैञीण त्याच्या सोबत रहाताना दिसली.

आणि कळून चुकलं….

इकडे काय घडत आहे ते..

तो तसा संयंमी ,शांत …मला पाहून…आरडाओरडा न करता, मला का आलीयस ही कारणेही न विचारता

 मला म्हणाला… Her name is preeti …my girlfriend ..we are in same company

and I want to marry her.

“पायाघालची जमिन सरकणं” काय असत ते अनुभवलं..

काय बोलावं काहीच कळतं नव्हतं..

हा एक लग्न झालेला माणून आपल्या बायकोला आपल्यापासून दूर ठेऊन आपल्या गर्लफ्रेंन्ड सोबत रहातो…आणि हे बायकोला काहीच माहीत नाही..

मला क्षणात वाटल…किती डोळे झाकून विश्वास ठेवला याच्यावर आणि….जे काय चाललयं हे त्याने एका शब्दांनेही कळून नाही दिले.

तो म्हणाला….I want divorce immediately .my advocate  sent u divorce paper in within 2-3 days.

मी काही बोलण्या अगोदरच. त्याने स्वतःचा एकट्याचा विचार करुन निर्णय घेतला होता.त्याच्या मनात,  घरात , हृदयात कुठेच स्थान नव्हत हे त्याच्या डोळ्यात दिसत होत.कदाचित हे सार काही त्याच्या

आई बाबांनाही माहीत असाव म्हणूनच तेही माझ्याशी लांब लांब वागत असावेत.

मी त्याला म्हणलं…मला तुझ्याशी शांतपणे दिनेश बोलायच…प्लिज तुझ्या मैञिणीला आजच्या दिवस जायला सांग…

आणि ते माझ त्याने ऐकलंही…

त्या राञी आम्ही दोघच होतो…

त्याला मी विचारलं हे कधीपासून आणि कसं सुरु झालयं??

 हम्म…तो खुप शांतपणे म्हणाला..सांगतो…..

आमचं ह्या एक वर्षातच जमलयं….तुझ्यापासून लपवल असे नाही…पण आमच ऐकमेंकावर प्रेम आहे हे ह्या काही दिवसातच आम्हालाही कळालं..

आम्ही दोघ एकाच टिममध्ये…too much workload , work pressure ,late night stay in office, lonlyness…my homelone depression  अश्या बर्याच गोष्टीमुळे आम्ही जास्त close येत गेलो.सतत तिच्यासोबत रहायचो..ऐकमेंकाची company  आवडायला लागली..मग एकञ रहायला लागलो..

दिनेश..ही जी कारणं सांगतोयस..ती सगळी कारणांमधून मी ही जातीय म्हणून मी कुणी दुसरा खांदा नाही पाहीला..मीही तुझच लोन भरते ना…??

हे सार करताना माझा एकदाही विचार करावा वाटला नाही तुला..??आपली संस्कृती काय सांगते आणि तू काय वागतोयस?? आज ही आवडली उद्या दुसरी आवडेल..मग काय पोरी बदलत बसणारेस का?? लग्न मोडणं सोप वाटत का तुला?

तुझी झाल्यापासून मी कशी एकटी तुझ्यापासून दूर राहीले ते माझं मलाच फक्त ठाऊक आहे.आणि तू म्हणतोस..मला वेगळ व्हायचं ..अरे मग कश्याला माझ्याशी लग्न केलसं.तुझा झाला लग्नाचा खेळ पण आता मी काय करु…प्लिज पुन्हा विचार कर….तू पुण्याला परत चल आपल्या स्वतःच्या घरी राहू..छान घर सजवू गुण्यागोविंदाने संसार करू..

पण….दिनेश स्वतःच्या मताशी ठाम होता…तो म्हणाला..”.माझं तुझ्यावर प्रेम नाही”

बसं आता मी मागे नाही फिरणार.मांझ सार काही ठरलयं.

मी काही बोलूनही उपयोग नव्हता….

“जहाज समुद्रात कधीच विहार करायला लागल होत…मध्येही जाऊन पोहचलं होत आणि मला पत्ताच नव्हता..ही सारी चुक माझीच होती असे वाटले .

नात मलाही संभाळता आलच नाही ना…मीही कुठेतरी कमी पडलेच असावी.”

“उंटावरुन शेळ्या राखता येतच नाही”…हे पटलं देखिल..प्रेमात नात दुराव्यात आणि दुराव्याच नात ही राहील नव्हतं..आणि सार काही संपल..

मी पुण्याला निघूनआले..दोन दिवसात त्याच्या वकिलांची नोटीसही आली…

आणि आता आम्ही वेगळं होतोयं…

“माझ एकच चुकलं…नवर्रावर खुप विश्वास ठेवला आणि तो म्हणाला म्हणून त्याचा विरह ही सहन केला.”

“नवर्याला सोडून जास्त दिवस माहेरी जाणंही चुकीचं ह्या मतापर्यंत मी आले बघं..”

“सहवासानेच प्रेम वाढतं आणि त्यासाठी एकञं रहाणं जरुरी आहे अगदी लग्न झालेल्या जोडप्यांनी तरी.त्याशिवाय ओढ निर्माण नाही होत.स्पर्शाची सवय नाही होत..हा ऐकमेंकाचा होणारा स्पर्श दोघांची मन ऐकमेंकापासून विलग करुन देत नाही तो अजून घट्ट बांधण्याच काम करतो.सगळा आंनद,दुःख दोघांनी एकञ शेअर केले की नात्याची रेशिमगाठ प्रेमाच्या धाग्यात बांधली जाते.”

“आमच असं काहीच नाही झाल गं…”

“सार काही चुकत गेल आणि….शेवटी माझ्या वाट्याला फक्त नात्यात विश्वासघातच पदरी पडला.”

मला आमचं नातं हव म्हणून उपयोग नाही ना ग.आता……नात्यात दोघंही तितकेच समरस असायला हवेत ना.त्याला जर माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल तर..एका चाकाचा तरी काय उपयोग??

आजवर सार काही ऐकले त्याचे.. आताही तो म्हणतोय म्हणून ह्यावेळीही होऊन जाऊ दे त्याच्याच मनासारखं…त्याच स्वातंत्र्य त्याला दिलं बघं…

बघू माझ काय होईल पुढे ते होईल…

“सारे नियतीचे खेळ…नशिबाच्या पुढे कोण जाणार गं!!”

मी माञ तिच सार काही ऐकून सुन्न झाले…एखाद्या हसर्या चेहर्यामागे इतक दुःख …बापरे..!! पण

तिने सार काही स्विकारलं होत कारणं तिच प्रेम असणार्या व्यक्तीला ती नको होती.

स्पंदन@सोनाली कुलकर्णी 

0 comments: