दिव्यांची अमावास्या आणि गोड कणकेचे दिवे कसे बनवायचे रेसिपी

आषाढी एकादशी झाली की वेध लागतात ते दीप अमावास्या येण्याचे...
त्या दिवशी .. दिव्यांची पूजा संध्याकाळी झाली की आई आम्हाला ओवळायची आणि आजी बाबांना ओवाळायची आणि गोड कणकेच्या पिठाचे दिवे नेवैद्य म्हणून खायला द्यायची.

खरतरं काही संस्कार हे लहान वयातच घरातून होत असतात...
आजी प्रत्येक सणावाराला जे काही करायची, ते का आणि कशासाठी करते हे सगळं ती आम्हाला समजावून सांगायची. 
तेव्हाही आजीकडे चातुर्मासाचे पुस्तक होते. त्या पुस्तकातील प्रत्येक सणाची कथा ती आम्हाला वाचून दाखवायची आणि त्याबद्दल माहिती द्यायची. आजी आता नसली तरी तिची आठवण मात्र आजही येते.😌

उद्या दीप अमावस्या आहे, म्हणून मला आठवले की एकदा मी आजीला विचारले होते, 'घरात इतके दिवे असताना हे पिठाचे दिवे कशाला करतेस?'
आजीने म्हणाली होती, 'गोड पिठाचे दिवे (कणकेचे दिवे) म्हणजे घरच गव्हाचे पीठ, तूप, गूळ अशा शुद्ध, सात्विक गोष्टी वापरून आपण तयार करतो. ते नुसते दिवे प्रकाशित करत नाही तर ते आपण देवाला नैवेद्य रूपात अर्पण करतो. या गोड पिठाच्या दिव्यांतून प्रेम, श्रद्धा, आदर आणि भक्तीची भावना व्यक्त होते.'

हे गोड पीठाचे दिवे बनवणं खूप सोपं आहे.. 
• अर्धी वाटी गूळ थोड्याशा पाण्यात गरम करून विरघळवून घ्यायचा.गुळ विरघळला की हे गुळाचे पाणी थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. 

• 1 वाटी गहू पीठ घेऊन त्यात वेलची पावडर ,आवडत असल्यास जायफळ पावडर ,चिमूटभर मीठ घालायचे
 नंतर त्यात गरम दोन चमचा तूप गरम करून तुपाचे मोहन पिठावर घालायचे आणि पिठाला हे तूप चांगले चोळून घ्यायचे म्हणजे, म्हणजे पीठ मऊ होते. 

•सगळ छान मिक्स करून झाले की मग त्यात थोडं थोडं गुळाचं पाणी घालून घट्टसर कणिक मळावी.मळलेली कणिक 10 मिन झाकून ठेवायची म्हणजे कणिक छान मुरते.
• मळलेल्या पिठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून  त्यांना दिव्याचा आकार द्यायचा 
• उकड पात्राला तूप लावून तयार केलेले दिवे अंतर ठेवून थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे कारण वाफवल्यानंतर ते थोडे फुगतात . 
दिवे मध्यम आचेवर १२-१५ मिनिटे वाफवून घ्यायचे.

वाफवलेले गरम गरम दिवे तयार झाले की जेव्हा आपण घरातील सगळ्या दिव्यांची पूजा करतो तेव्हा हेही दिवे देवासमोर नैवेद्य म्हणून अर्पण करायचे. प्रत्येक दिव्यात थोडे साजूक तूप आणि फुलवाती घालून ते प्रज्वलित करायचे नंतर हे दिवे प्रसाद म्हणून खायला द्यायचे.  "साजूक तूप आणि गूळ घालून केलेल्या या दिव्यांची चव खूपच छान लागते."

 म्हणूनच दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची  परंपरा म्हणजे केवळ दिव्यांची पूजा नाही, तर प्रकाशाचं महत्त्व ओळखून अंध:कारावर विजय साजरा करणं आहे. घरातील सगळ्या दिव्यांना स्वच्छ करून त्या दिव्यांची पूजा करणं म्हणजे घरातील प्रत्येक दिव्याला मान देणं, त्यांचं पूजन करणं,  त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन  श्रावण महिन्याला पवित्र सुरुवात होतेय

उद्या प्रत्येकाच्या घरी दिव्यांची पूजा होईल सगळ्यांची घरं पुन्हा एकदा उजळून निघतील... सकारात्मकतेने दिशेने!

'दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।
 गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥'

@सोनाली कुलकर्णी 

#दीपअमावास्या #गोडकणकेचेदिवे #followers #deepamawasya 

कणकेचे गोड दिवे कसे बनवायचे?
(टीप : प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते मी माझी मांडण्याचा प्रयत्न केला आहे)

0 comments: