नातं नवरा बायको...

सप्तपदी घेऊन अग्निच्या साक्षीने..ज्या नात्यात घट्ट बांधले जातो...ते सुंदर नात....लग्नाच...नवरा बायकोच!

लग्न करणं खुप सोपी गोष्ट आहे....पण ती टिकवणं..फुलवणं..त्याला छान बहर येऊन देणं ही दोघांची जबाबदारी आहे...
लग्नाआधी.....स्वतंत्र असलेले दोघ एका नात्यात बांधले गेले कि.....सुरू होतो तो...अगदी सोपा नाही आणि खुप अवघड पण नाही असा संसाराचा डोलारा सांभाळण्याचा प्रवास...

त्यात दोघांनाही कष्ट करण्याची ताकद,सहनशिलता,सजुदारपणा..तडतोड याची मानसिकता ठेवावीच लागते....कारण म्हणतात ना 
"नवरा बायको दोन चाक असतात.." 
एक बंद पडून किंवा नाराज असून चालतच नाही ..समतोल कायम रहाणे खूप गरजेच आहे.....

आजकाल दोघांनी नोकरी करणं गरजेच आहे.....
दोघांचीपण घर ,मुल,नातेवाईक,नोकरी तारेवरची कसरत सुरु असते...प्रत्येकवेळा पैशाची जुळवाजुळव करणे ,
होमलोनच टेंन्शन,अचानक येणारी आजारण,वयस्कर आई-वडील,मुलांची स्कुल फी.....पाळणाघर...होम मेटेंनन्स ...बापरे बाप सगळा पैशांचा खेळ.....
आणि ह्या तर सगळ्याच गोष्टींची सगळ्यांना सोय करावीच लागते...पण हे सगळं करत असताना....
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहुन जाते..."जगणं",
कुंटुंबाला वेळ देण....

...हम्म ह्या सगळ्याच गोष्टींचा नाईलाज आहे..कराव्या तर लागणारच.....पण तरीही....
ती सल प्रत्येकाच्या मनात राहुनच जाते...
सगळे आपआपल्यापरीने जगतात...आणि 
स्वताःलाच असच असत आयुष्य असे समजवत रहातात....
आणि हो हे केल्याशिवाय हा संसाराचा गाढा पुढे ओढलाही जाणार नाही ना....

असच जगायचं...जसा प्रवाह येईल तस...
पण जमेल तेव्हा ,
एकमेंकाना वेळ देऊन,प्रेमाने,आपुलकीने,नात्यातला ओलावा कायम टिकवून,आपण एकमेंकाचे भक्कम आधारच आहोत..आणि शेवटच्या श्वासापर्यंत एक आहोत ही मनात भावना ठेवूनच.
आणि ही दोघांनी एकमेंकाना जाणिव करुन देऊन....शब्द,स्पर्श,डोळे...सगळयाच्या माध्यमातुन.....मग हे प्रेमळ नातं खरच खूप बहरेल,रातराणीच्या सुवासाप्रमाणे चौफेर दरवळेल....आणि त्याचा आंनद अगदी शेवटच्या श्वासापर्यंत टिकेल....!!
स्पंदन@सोनाली कुलकर्णी

#followers #marriedcouple
विठ्ठल पांडुरंग माझा सखा

#पांडुरंग_माझा_सखा

पांडुरंगा, पांडुरंगा...” या गजरात नुसते शब्द नाहीत, तर त्यामागे आहे एक नातं – नातं मैत्रीचं, विश्वासाचं आणि निखळ भक्तीचं. आषाढी एकादशी म्हणजे या नात्याचं पुन्हा एकदा उजळून निघणं.

पांडुरंग म्हणजे केवळ एक देव नाही, तो आहे भक्तांचा सखा. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव सगळ्यांचाच तो सखाच तर होताच पण त्यांच्या दुःखात सहभागी होणारा, त्यांच्या आनंदात नाचणारा ,आनंद मानणारा. तो आपल्या भक्ताच्या मनात राहतो, त्याच्या मनातली भाषा समजतो.

वारी ही फक्त पंढरपूरची वाट नाही, ती आहे या सख्याच्या भेटीची आस. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ, मुखात नाम 
“विठोबा माझा सखा आहे,” या विश्वासानं वारकरी निघतो.
 पाय दुखतात, अंग थकतं, तरी मन आनंदात असतं. 
कारण त्याला माहित असतं, त्या चंद्रभागेच्या तिरी आपला सखा उभा आहे संकटातही सावलीसारखी साथ देणारा ! 

लहानपणापासूनच हा सखा आपल्याला घरातच भेटत असतो ,कधी आजीच्या कधी आईच्या गोष्टींमधून,
भजनांतून,तर कधी मंदिरातल्या त्या शांत विठ्ठलमूर्तीमधून.
आपलं रडणं असो, हसणं असो, की मनातल्या भावना
सगळं काही त्याला माहित असतं.
पांडुरंग विठू माऊली कधी रागावत नाही,कोणतीच तक्रार करत नाही... फक्त ऐकतो आणि न बोलता सगळं समजून घेतो 
आपल्या जिवलग सख्यासारखा.

आजच्या धकाधकीच्या जीवनातही पांडुरंग आपल्या सोबतच असतो.कधी मंदिरातल्या शांत दर्शनात, कधी मोबाइल स्क्रीनवर दिसणाऱ्या त्याच्या प्रतिमेत.
कधी Spotify, यूट्यूबवर ऐकलेल्या अभंगमालिकेत, जपनामात, की भजनाच्या सुरात…
तो आहेच आपल्या श्वासासारखा, प्रत्येक ठिकाणी आपल्या सोबत प्रत्येक क्षणात.

सखा पांडुरंग म्हणजे श्रद्धेचा ओलावा, विश्वासाचं बळ, आणि न संपणारी साथ. 
आषाढी एकादशीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्याला हाक मारायची 
“ विठू माऊली ,सख्या, हात धर! बाकी सर्व तुझ्यावर सोपवलं आहे!”

आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ☘️🙏
जय हरी विठ्ठल!
जय जय रामकृष्णहरी!
@सोनाली कुलकर्णी 
#पांडुरंग_माझा_सखा 
#aashadhiekadashi #aashadhiwari #विठ्ठल #vitthalrakhumai #vitthalbhakti #vitthalmauli
लाल मिरचीचा रंजका | लाल मिरचीचा ठेचा रेसिपी
आमचं लग्न झाल्यानंतर मी एक दिवस निवांत नवऱ्याच्या काय आवडी निवडी आहेत हे जाणून घेत होते....
बऱ्याच गोष्टी काय काय आवडत ते सांगत होता..त्यातले बरेच पदार्थ हे कर्नाटक स्पेशल होते..मी आपली पश्चिम  महाराष्ट्रातली 
मला काही पदार्थ हे नवखेच होते..
पण मधेच त्यानं मला विचारलं तुला  लाल मिरचीचा रंजका बनवायला येतो का??मला खूप आवडतो 
मी आं .. करत विचारलं रंजका??
काय हा प्रकार??
(सगळे काहीतरी गोड थोड पदार्थ सांगतात पण ह्याने तर लाल मिरचीचा पदार्थ सांगितला ...🙄)
मी कुतूहलाने विचारलं की कसा करतात??
मग तो म्हणाला आई करते बघ माझ्या आईला विचार ...
मग काय करणार...नवऱ्याला आवडणारी गोष्ट शिकायला हवी म्हणून मग सासूबाईकडून रेसिपी जाणून घेतली आणि ओल्या लाल मिरच्यांच्या शोध माझा सुरू झाला
त्यांनी रेसिपी सांगितली तसे म्हणलं...अरे अरे हा तर...लाल मिरचीचा ठेचा झाला...
खरंतर रंजका म्हणजे जवळपास आपल्या कोल्हापुरी लाल मिरचीचा ठेचाच म्हणायला काही हरकत नाही...पण...
हा रंजका काही मिनिट कढईमध्ये तेलात परतून घेतात..

पण पुण्यात ह्या अश्या लाल ओल्या मिरच्या अगदी दुकानदाराने स्वतः निवडून बाजूला करून ठेवल्या असतील तर पटकन मिळतात नाहीतर  ओल्या लाल मिरच्या जास्त प्रमाणात मिळणे म्हणजे दिव्यच....
मग मी भाजीच्या दुकानात गेले की भाजी निवडून घ्यायची तश्या लाल लाल मिरच्या निवडून घ्यायच्या.... किमान पाव किलो तरी पाहिजे ना...
एका दुकानात भरपूर ओल्या लाल मिरच्या नाही मिळाल्या
की मी आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या भाजीच्या दुकानातून लाल मिरच्या गोळा करायची..( काय करायचं नवऱ्याला घरी बनवलेला रंजका आवडतो तर😆 )
एकदा का सगळीकडे गोळा करून भरपूर मिरच्या साठल्या की..
माझा लाल मिरचीचा रंजका बनवण्याचा प्रवास सुरू...

लाल मिरचीचा रंजका रेसिपी :
•ओल्या लाल मिरच्या किमान पाव किलो घ्यायच्या त्या आधी स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या
•लसूण अर्धी वाटी सोलून घ्यायचा 
•एक चमचा मेथी दाणे आणि एक चमचा जिरे भाजून घेऊन त्याची पावडर करून घ्यायची
•मग मिक्सर च्या भांड्यात लसूण आणि लाल मिरच्या थोडस बारीक करून घ्यायच्या 
•त्यानंतर त्यात मेथी जिरे पावडर ,दीड चमचा मीठ
आणि दोन लिंबाचा रस पिळून घालायचा
•आणि..मिक्सर वरुण छान वाटून घ्यायचे.

• त्यानंतर 3–4 चमचे तेल गरम करायचं त्यात पाव चमचा हिंग घालायचा आणि मिक्सर वरून काढलेले वाटण तेलात घालायचं..आणि चांगल 4 मीन परतून घ्यायचे...
आणि मग तयार झाला आपला हा ओल्या लाल मिरचीचा रंजका..
खरच खायला टेस्टी लागतो.
लिंबाची आणि मेथीची चव ह्या रंजक्या मधे म्हणजे आहा ...😍

 रंजका टिकण्यासाठी आपण लिंबू रस घातलाच आहे पण थोडासा तेलाचा थर वरती राहून दिला तर हा रंजका बाहेर सुद्धा चांगला टिकतो नाहीतर फ्रिज मधे ठेवला तर 4–5 महिने  आरामात टिकतो.

बरं रेसिपी तर सांगितली..
पण ते काय झाले मी सुरवातीला कुतूहलाने करत होते...पण आता ...कर्नाटक मध्ये लाल मिरच्याचा रंजका प्रसिद्ध तर आहेच पण लाल मिरच्या पण चटकन  मिळतात.आता..
जसे मीठ कधीच संपू नये घरातले म्हणतात ना तसे 
ह्या लाल मिरचीच्या रंजकाचे झाले आहे...
कायमच माझ्याकडे ... रंजका बनवलेला असतो.
मधेच पोळी भातासोबत हळूच टोचून खायला तिखट असला तरी एकदा की लिंबाच्या रसात मुरला की खायला भारी लागतो.
आज लाल ताज्या मिरच्या मिळाल्या आणि बनवला आपला झणझणीत रंजका 😍
भाग, प्रांत,राज्य बदलतात तश्या पदार्थ एकच असतो पण त्याची करण्याची पद्धत बदलते, नावही बदलते,तर तुमच्याकडे ह्या लाल मिरच्यांच्या रंजकाला काय म्हणतात..नक्की comment मध्ये सांगा..
@ सोनाली कुलकर्णी 

#रंजका_पुराण #lalmirchichathecha
बदामी भूतनाथ टेम्पल
बदामाची शाकंभरी देवी आमची कुलस्वामिनी, त्यामुळे माझे लग्न झाल्यापासून दरवर्षी वर्षातून एकदा तरी बदामीला देवीला जातोच.
बदामाच्या आसपास पाहण्यासारख ,फिरण्यासारख बरेच ठिकाण आहेत जिथे तुम्ही आवर्जून भेट द्यावी...
त्यातलच एक ठिकाण म्हणजे ..बदामी गावातच असलेल... भूतनाथ मंदिर

भूतनाथ मंदिरांचे समूह कर्नाटक राज्यातील बादामी गावाच्या पूर्वेकडील अगस्त्य तलावाच्या काठावर वसलेले आहे. आजुबाजूला संपूर्ण तलावाचे पाणी , समोरच उंचावर दिसणाऱ्या बदामी गुंफा अतिशय नेत्र सुख देणारं आहे.

भूतनाथ मंदिर बादामीमधील एक महत्त्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. हे मंदिर चालुक्यकालीन कला आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे

इतिहास सांगायचा झालाच तर तिथली मंदिरे 7 व्या ते 12 व्या शतकातील आहेत. चालुक्यांच्या काळात बांधला गेला,
मंदिरांच्या समूहात दोन मुख्य उपगट आहेत:
 मुख्य भूतनाथ मंदिर (पूर्व) जे 7 व्या ते 8 व्या शतकात द्रविड शैलीत बांधले गेले. 
 मल्लिकार्जुन मंदिर (उत्तर) जे 11 व्या ते 12 व्या शतकात बांधले गेले नागर शैलीत कल्याणी चालुक्यांनी बांधले आहे.

ही मंदिरे भगवान शिवाला समर्पित आहेत, येथे त्यांना 'भूतनाथ' म्हणजे 'आत्म्याचे स्वामी' म्हणून पूजले जाते.त्यामुळे मंदिरामध्ये शिवपिंड आहे. भिंतीवर सुद्धा शिवपिंडचे कोरीव काम आहे.
वास्तुकला खूप सुंदर आहे .मंदिरांमध्ये सुंदर कोरीव काम केलेले खांब आणि भिंती आहेत, ज्यांवर रामायण आणि महाभारत यांसारख्या पौराणिक कथांमधील दृश्ये कोरलेली आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गंगा आणि यमुना या नद्यांच्या प्रतिमा आहेत.

संध्याकाळी खूप छान वाटत ह्या ठिकाणी...
तलावाच्या काठावरा जाऊन बसायला..
जेव्हा जेव्हा आमच्याकडे जर वेळ असेल तेव्हा ह्या ठिकाणी आम्ही नेहमीच जातो.भूतनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता हा बदामीच्या बाजार पेठेतून जातो थोडासा रस्ता गल्ली सारखा आहे ,पण रिक्षा , कार जावू शकते.
तलावाच्या काठावर भले मोठे चिंचेचे झाड आहे ,आजुबाजूला लेणी आहेत त्यामुळे माकड भरपूर आहेत..
(ह्या वर्षी माकडाने आयुष च्या हातातली फ्रुटी पॅक पळवून नेले)
आपलेच स्वतःचे भरपूर फोटो काढून फोटोसेशन करायल देखील खूप वाव आहे.

कधी गेलाच बदामीला तर...
ह्या सुंदर ठिकाणाला भेट द्यायला विसरू नका...
@सोनाली कुलकर्णी 


#बदामी #badami #memoriesrecreate #भुतनाथटेम्पल
#travelblogger #travelphotography #karanataka #follower #highlight
चिरमुरे आणि आजीची आठवण
गावाकडे मापट्यावर , पायलीच्या मापाने ,मोठ पोत भरून चिरमुरे विकायला दर आठवड्यातून एकदा सायकल वरून माणूस यायचा.
चिरमुरे, चिरमुरे करत तो माणूस गावभर  फिरायचा.....
अख्खा गावातून एक वेढा मारला तरी त्याच भल मोठ आणलेले चिरमुर्याचे पोत संपून जायचं.....
लोकांना त्याची सवय झाल्यावर त्याचा वार पण ठरवला गेला होता... लोक एक आठवड्याच्या हिशोबाने चिरमुरे घेऊन ठेवायचे आणि पुढच्या आठवड्यात तो परत येईल याची वाट पाहायचे..
तसा ...इकडे तिकडे जरा मोठ असलेल्या गावात आठवडी बाजार भरायचा त्या गावात पण चिरमुरे वाले असायचे...
पण....
हा असा चिरमुरे विकायला घेऊन येणारा माणूस सोईस्कर वाटायचा.नवीन नवीन ताजे ताजे भट्टीतून काढलेले चिरमुरे खायला मजा यायची.
लहान असताना आजी ,बाबा नेहमी असे चिरमुरे घ्यायचे...
भेळ हा प्रकार फारसा बनवला नाही जायचा.....
एकतर लसूण घालून केलेलं भडंग  किंवा मग.... 
पांढऱ्या चिरमुर्यावर तिखट , मीठ ,मेतकूट,तेल घालून हाताने एकसारखे केलेले चिरमुरे..आजी बनवायची..
त्यात हवे तर कांदा ,टोमॅटो , कोथिंबीर घालायची कधीतरी...
पण...
असेच....नुसते तिखट मीठ मेतकूट तेल घालून लावलेले चिरमुरे पण भारी लागायचे...
आपल्या महाराष्ट्रात मिळणारे चिरमुरे मस्त टपोरी ,कुरकुरीत मिळतात.जो सांगली किंवा कोल्हापुरी भेळ साठी वापरला जातो.

गेले 5 वर्ष झाले Bangalore मध्ये राहते....तसे चिरमुरे इकडे मिळत नाही आणि पाहिजेच असेल तर खूप शोधावं लागत.
आज घरात चिरमुरे होते पण आपल्याकडे मिळतात तसे नसले तरी...
आजी जाऊन अनेक वर्ष झाली आहेत पण आज चिरमुरे पाहून खूप जास्त आजीची आठवण आली... 
म्हणून...मग...
तिच्या आठवणीत थोडंस विसावून, तिच्यासोबतच बालपण आठवत...
मस्त तिखट मीठ मेतकूट तेल घालून चिरमुरे लावले !
आणि त्याचाच आस्वाद आठवणीना पुन्हा एकदा उजाळा दिला.

खरतरं आजी म्हणजे आठवणीचा खजिना....आणि मायेचा हळवा प्रेमाचा साठा..कधीही न संपणारा...
@सोनाली कुलकर्णी 

#आजीची_आठवण #गावाकडच्या_गोष्ठी
आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधीच गृहीत धरू नये.....
आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधीच गृहीत धरू नये....जर तुम्ही खरच समोरच्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत असाल तर...💕
Follow for more post @spandankavitaa 
#प्रेम #मराठीस्टेटस #reelsinstagram #marathistatus #reelitfeelit #marathimotivational #feelkaroreelkaro #marathiqoutes #reelsoftheday #reelkarofeelkaro #treandingreels #trending